Saturday, 24 September 2011

Three Factors affecting Human Development.

यशस्वी होण्यासाठी तीन महत्वाच्या गोष्टी 

कोणत्याही माणसाच्या विकासासाठी पुढील तीन गोष्टी महत्वाच्या असतात असे मला वाटते.
१. भाषा  २.जीवन  कौशल्ये  ३.स्वयंशिक्षण तंत्र 
 या तीन गोष्टींवर प्रभुत्व असेल तर कोणताही माणूस जगात यशस्वी होऊ शकेल.  
या तीन्ही गोष्टींची सविस्तर माहिती प्रत्येकाला असण्याची गरज आहे.
त्या जरा खुलासेवार समजून घेऊ या.

१. भाषा : भाषेमुळे माणसाला दुसऱ्याचे विचार समजून घेता येतात, तसेच स्वतःचे विचार दुसऱ्याला
समजावून देता येतात. कोणत्याही दोन किंवा अधिक माणसांमध्ये संवादासाठी भाषा आवश्यक असते.
भाषेची चार कौशल्ये असतात.
(अ) श्रवण - (ऐकणे)
(ब) संभाषण -(बोलणे)
(क) वाचन - (वाचणे)
(ड) लेखन - (लिहिणे)
ही चार मूलभूत कौशल्ये अत्यंत उत्तम प्रकारे आत्मसात केली तरच भाषेवर प्रभुत्व आहे असे समजले जाते.
परंतु सामान्यतः श्रवण आणि संभाषण या दोन्ही कौशल्यांकडे दुर्लक्ष केले जाते, आणि वाचन व लेखन या 
कौशल्यांकडे जास्त लक्ष दिले जाते. वास्तविक पाहता श्रवण आणि संभाषण ही कौशल्ये दैनंदिन व्यवहारात
अधिक वापरावी लागतात. पण नेमकी तीच कौशल्ये नीट येत नसल्यामुळे असे लोक व्यवहारात मागे पडतात.
म्हणून भाषा शिकताना किंवा शिकवताना श्रवण आणि संभाषण या कौशल्यांकडे जाणीवपूर्वक अधिक लक्ष द्यायला हवे. ही कौशल्ये शिकवताना शिकणाऱ्याच्या बोली भाषेपासून सुरवात करून हळूहळू त्याला प्रमाण भाषेकडे न्यावे लागते. गाणी, गोष्टी, नाट्यीकरण, भाषिक खेळ, गप्पा, चर्चा याचा भरपूर वापर करावा लागतो. वाचन आणि लेखन ही कौशल्ये त्यानंतर शिकणे सोपे होते.

२. जीवन कौशल्ये: 
 आपण किती जगलो त्यापेक्षा कसे जगलो हे जास्त महत्वाचे आहे. जीवनाचा दर्जा उत्तमच असला पाहिजे. हा दर्जा उत्तम ठेवणे आपल्या हाती असते. त्यासाठी  काही कौशल्यांची आवश्यकता असते. ही जीवन कौशल्ये पुढीलप्रमाणे आहेत.

  • `स्व`ची ओळख (Know Yourself)
  • श-त्रु-सं-धो  विश्लेषण ( SWOT Analysis )
  • आंतरव्यक्तिक जाणीव ( Inter-Personal Perception )
  • आंतरव्यक्तिक सहसंबंध ( Inter-Personal Relationship ) 
  • संवाद-कौशल्ये  ( Communication Skills )
  • सृजनशील विचार (Creative Thinking)
  • चिकित्सक विचार (Critical Thinking)
  • समस्या परिहार (Problem Solving)
  • निर्णय क्षमता (Decision Making)
  • नेतृत्व क्षमता (Leadership Qualities)
  • सकारात्मक विचार (Positive Thinking)
  • काल- व्यवस्थापन (Time Management)
  • तणाव -व्यवस्थापन (Stress Management)
  • भूमिका आणि कर्तव्यांची समज (Understanding Roles and Functions)
ही सर्व जीवन कौशल्ये कोणत्याही वयाच्या आणि कोणत्याही व्यवसायातील माणसाला आयुष्यभर उपयोगी पडतात.ही कौशल्ये शिकलेला माणूस आपल्या कुटुंबात,आपल्या व्यवसायात तसेच समाजात यशस्वी होतो.

३. स्वयंशिक्षण तंत्र:
आपल्याला आपल्या विविध भूमिका योग्य प्रकारे पार पाडण्यासाठी अनेक गोष्टी शिकाव्या लागतात. आपले हे   शिक्षण आयुष्यभर चालू असते.हे शिक्षण घेण्यासाठी स्वतः पुढाकार घ्यावा लागतो.मनाचा पक्का निर्धार करावा लागतो. शाळा-कॉलेज सारख्या संस्थेत जाऊन पूर्ण वेळ शिकणे एवढा एकच मार्ग त्यासाठी नसतो. पुढे दिलेल्या अनेक मार्गांचा वापर करून आता कोणीही  कितीही शिकू शकतो.केव्हाही शिकू शकतो.
  • अर्धवेळ शिक्षण 
  • मुक्त शिक्षण 
  • अनौपचारिक शिक्षण 
  • बहिस्थ शिक्षण 
  • पत्राद्वारा शिक्षण 
  • दूर शिक्षण 
  • छोटे अभ्यासक्रम 
  • ऑन-लाईन शिक्षण 
  • स्वयंसेवी संस्थांमार्फत घेतली जाणारी शिबिरे,मेळावे इ.उपक्रम 
  • तांत्रिक शिक्षणाचे छोटे अभ्यासक्रम 
  • विविध व्यवसायांचे छोटे अभ्यासक्रम 
  • आभासी वर्गाद्वारा शिक्षण 
  • दृकश्राव्य साधनाद्वारा शिक्षण 
अशा अनेक पद्धतींचा वापर करून शासनातर्फे तसेच विविध संस्थांमार्फत अभ्यासक्रम चालविले जातात. हे अभ्यासक्रम लहान असतात. शिकणारयाच्या सोयीनुसार जागा, वेळ, आणि परीक्षा पद्धती असते. एक एक विषय शिकत शिकत सगळा अभ्यासक्रम पुरा करता येतो. फीमध्ये सवलत मिळते. आर्थिक मदत मिळू शकते. वयाचे बंधन नसते. फक्त शिकायची इच्छा पाहिजे आणि कष्टाची तयारी पाहिजे.

आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही वयात आवश्यक असलेली माहिती आणि कौशल्ये या पद्धतींनी शिकता येतात.त्यामुळे आपले जीवन गुणवत्तापूर्ण होते.

अशा प्रकारे भाषा, जीवनकौशल्ये आणि स्वयंशिक्षणाचे तंत्र या तीन गोष्टींवर प्रभुत्व प्राप्त केल्यास कोणताही माणूस जीवनात यशस्वी होऊ शकेल याची मला खात्री आहे.
                                                ------------xxx-----------xxx-------------

Saturday, 30 July 2011

Education: Cause and Effect of Development

शिक्षण आणि विकास 

शिक्षण आणि विकास यांचा फार जवळचा संबंध आहे. शिक्षणामुळे विकास होण्यासाठी मदत होते तसेच विकास झालेल्या ठिकाणी शिक्षणाला अनुकूल परिस्थिती उपलब्ध होते.

जिथे निरक्षरता जास्त, तिथे बदलासाठी लोकांची मानसिकता तयार झालेली नसते. त्यामुळे नवीन माहिती लोकांना मिळत नाही.लोकांमध्ये नव्या जाणिवा निर्माण होत नाहीत.विचार पारंपारिक राहतात. संपूर्ण मानवी जीवन मागासलेले राहते.आर्थिक दुरवस्था, जुनाट विचारसरणी यामुळे मनुष्यबळाचा विकास खुंटतो.अशा ठिकाणी मुले, युवक,प्रौढ यांच्यासाठी शिक्षणाचे विविध उपक्रम घेतले तर तेथे विकासप्रक्रिया सुरु होते. आपण मागास का आहोत हे लोकांना समजायला लागते.बाहेरच्या जगाची ओळख होते.नव्या प्रेरणा मिळतात.एकत्र येऊन आपण आपले जग बदलू शकतो असा आत्मविश्वास लोकांमध्ये निर्माण होतो.त्यातून कृतीला चालना मिळते आणि विकासाला सुरवात होते. या अर्थाने शिक्षण हे विकासाचे कारण ठरते.

दुसरीकडे असेही दिसते की विकसित भागामध्ये लोकांना नवीन गोष्टी समजून घेण्याची हौस असते. त्यामुळे लोक सतत वेगवेगळ्या माध्यमातून काही ना काही शिकण्याचा प्रयत्न करीत असतात. अशा ठिकाणी लोकांचे वेगवेगळे गट त्यांच्या गरजेनुसार शिक्षणाचे अनेक उपक्रम सुरु करतात. स्वतः होऊन पुढाकार घेतात.निधी जमा करतात.मदत मिळवतात.मुलांसाठी,युवकांसाठी,स्त्रियांसाठी,शेतकऱ्यांसाठी शिक्षणाची केंद्रे चालवतात.म्हणजेच विकासामुळे शैक्षणिक सोयी सुविधा झपाट्याने वाढायला मदत होते.अशा प्रकारे शिक्षण हे विकासाचे परिणाम ठरते.

या विवेचनावरून असे लक्षात येईल की शिक्षणाचा आणि विकासाचा फार जवळचा संबंध आहे. 

Thursday, 28 July 2011

Relation between Education and Development

Education really works as a powerful instrument for development. Education is useful for self-development as well as for community development.It works as a support for infrastructural development.Through education,the fruits of all kinds of development are reached to all the persons in the community, especially the weaker sections of the society which need them most. In all our next writings, we will see how it happens and how can we help this process.