Wednesday, 2 August 2023

पालकांनो, इकडे लक्ष द्या !

 आपल्या मुलाची/मुलीची शिकण्याची क्षमता अफाट आहे. हे किती पालकांना माहीत असते?

क्षमता म्हणजे काय ?

शिकण्याची क्षमता म्हणजे काय ?

ही क्षमता वाढू शकते का ?

अशा अनेक गोष्टी पालकांना नीट माहीत नसतात.

त्या समजून घेण्याचे प्रयत्नही फारसे पालक करताना दिसत नाहीत.


https://padlet.com/bgbokil3/my-smart-padlet-xdgduutydmyjl298

वरील लिंक ओपन करून पहा.

Sunday, 10 July 2022

शिक्षण म्हणजे काय ?

 `शिक्षण म्हणजे काय ?' 











`शिक्षण म्हणजे काय ?'

हा प्रश्न विचारला की अनेक उत्तरे मिळतात.

अनेक विद्वानांनी आणि तत्ववेत्त्यांनी या प्रश्नाची समर्पक उत्तरे दिलेली आहेत.

तसेच आपल्यापैकी  प्रत्येकजण त्याच्या कल्पनेप्रमाणे उत्तर देतो.

खालील उत्तरे पहा .

शिक्षण ही एक प्रक्रिया आहे.

शिक्षण म्हणजे भोवतालच्या जगाची माहिती मिळवण्याची प्रक्रिया.

शिक्षण म्हणजे ज्ञान निर्माण करण्याची प्रक्रिया.

शिक्षण म्हणजे आपल्या क्षमता मजबूत करणे.

शिक्षण म्हणजे नवीन कौशल्य शिकणे.

शिक्षण म्हणजे आपले विचार तयार करणे.

शिक्षण म्हणजे आपले विचार तपासून पाहणे.

शिक्षण म्हणजे आपल्यापुढील अडचणी सोडवणे.

शिक्षण म्हणजे एकमेकांना समजून घेणे.

शिक्षण म्हणजे एकमेकांबरोबर आनंदाने काम करणे. 

शिक्षण म्हणजे परिस्थिती समजून घेऊन धीटपणाने परिस्थितीतून मार्ग काढणे.

शिक्षण म्हणजे दुसऱ्याचा आदर राखून स्वतःचा सन्मान ठेवणे.

शिक्षण म्हणजे इतरांचे स्वातंत्र्य राखून आपले स्वातंत्र्य जपणे.  

शिक्षण म्हणजे समाजातील बदल आनंदाने स्वीकारणे. 

शिक्षण म्हणजे स्वावलंबी बनणे. 

शिक्षण म्हणजे निसर्गाची जपणूक करणे. 

ही सगळी उत्तरे बरोबर आहेत असे वाटेल.

पण यातील सर्वात पहिले उत्तर बरोबर आहे. 

बाकीची उत्तरे म्हणजे शिक्षणाचे परिणाम आहेत किंवा उपयोग आहेत.

गम्मत अशी की आपण फक्त शिक्षणाच्या आपल्याला चांगल्या वाटणाऱ्या परिणामांचा विचार करतो.

उदाहरणार्थ, आपण कधी कधी मुलांना म्हणतो, ` या नको त्या गोष्टी कुठून शिकलास रे तू ? '

म्हणजे `नको त्या गोष्टींचे ' सुद्धा शिक्षण होते ही गोष्ट आपण मान्य करतो.

याचाच अर्थ असा की `शिक्षणाची प्रक्रिया ' ही एक वेगळी गोष्ट आहे आणि बालक ( किंवा माणूस ) ` काय ' शिकते  ही वेगळी गोष्ट आहे.` 

आणखी एक गोष्ट यातून लक्षात येते. ती म्हणजे शिक्षण हे शिकवणाऱ्या व्यक्तीच्या इच्छेनुसार होईलच असे नाही, कारण शिकण्याची प्रक्रिया शिकणाऱ्या व्यक्तीच्या मेंदूमध्ये घडून येते. थोडक्यात, शिक्षण बाहेरून ` कोंबता ' येत नाही.

जर आपण ही ` शिक्षणाची प्रक्रिया ' नीट समजून घेतली तर बालक ( किंवा माणूस)  `काय ' शिकेल त्यावर नियंत्रण आणता येईल.

बालकाच्या शिक्षणामध्ये खालील तीन घटक  महत्वाची भूमिका पार पाडतात.

१. पालक २. शिक्षक ३. समाजातील इतर व्यक्ती 

या तीनही घटकांनी पुढील गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत.

  • बालक कसे शिकते ?
  • शिकण्याची प्रक्रिया कशी होते ?
  • बालक शिकत असताना त्याच्या मेंदूमध्ये नेमके काय घडते ?
  • बालकाची शिकण्याची प्रक्रिया जन्माच्या क्षणापासूनच कशी सुरु होते ?
  • बालकाने अपेक्षित गोष्ट शिकण्यासाठी आपण नेमके काय करायला हवे आणि काय टाळायला हवे ?
ह्या गोष्टी विशेषतः पालकांनी समजून घेतल्या पाहिजेत.

बालकाच्या जन्मापासूनच स्वतःची जबाबदारी ओळखून वागले पाहिजे.

ज्यांना या बाबतीत अधिक माहिती हवी असेल त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा.

Mob : +91 9823918223
Website : Zerotoeight.in

  

                                                     -------------------------------------          







Thursday, 9 December 2021

पालकांनी शिकायला हवे !

 पालकांनी शिकायला हवे !




वरील पोस्टर पहा. त्यातील मजकूर वाचा. त्या मजकुराचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करा. 
बालकाचे पहिले २१०० दिवस म्हणजे आईच्या गरोदरावस्थेपासून बालक सहा वर्षाचे होईपर्यंतचा काळ. 
पुढचे २१००० दिवस म्हणजे सुमारे ७५ वर्षांचा काळ. 
ही पुढची ७५ वर्षे कशी जातील हे पहिल्या सहा वर्षात ठरेल असे हे पोस्टर सुचविते. 
मग पालकांनी हा विचार करायला हवा. 
आपल्या बालकाची पहिली सहा वर्षे कशी असावीत याचा विचार करून ती वर्षे योग्य पद्धतीने वापरायला हवीत. 
हे सगळे शास्त्र समजून घ्यायला हवे. 
त्यासाठी शास्त्रीय माहिती घ्यायला हवी. 
म्हणजेच पालकांनी हे सगळे शिकायला हवे. 

अधिक माहितीसाठी संपर्क साधा. 
bgbokil@yahoo.com 




Tuesday, 15 December 2020

आपण 'शिक्षण साक्षर' आहोत का ?


 आपण 'शिक्षण साक्षर' आहोत का ?

या लेखाचे हे नाव थोडेसे विचित्र वाटते ना ? 
तुमची शंका बरोबर आहे.
आपण शिकलेले आहोत, पण आपल्याला `शिक्षण' या विषयाबाबत किती माहिती आहे ?
आपण सगळेजण 'शिक्षण' या विषयाबाबत खूप बोलत असतो, पण शिक्षणाच्या क्षेत्रातील काही साध्या-साध्या शब्दांचीही आपल्याला पुरेशी माहिती नसते किंवा त्या संकल्पना आपल्याला नीट माहीत नसतात.
 उदाहरणार्थ, शिक्षण म्हणजे नेमके काय? माहिती आणि ज्ञान यामध्ये काय फरक आहे ?कौशल्य आणि क्षमता या शब्दांचे नेमके अर्थ काय ? कोणत्या गोष्टींची शिकण्याची सुरुवात केव्हा करावी ? बुद्धिमत्ता म्हणजे काय ? अशा अनेक गोष्टी आपल्याला नीट माहीत नसतात.
या गोष्टी नीट समजलेल्या नसल्या तरी आपण त्यावर भरपूर बोलत असतो.
म्हणजेच आपण शिक्षण या विषयाबाबत पुरेसे साक्षर नसतो.
आरोग्य साक्षरता, पर्यावरण साक्षरता, अर्थसाक्षरता, माध्यम साक्षरता असे साक्षरतेचे अनेक प्रकार आपल्याला माहीत आहेत. त्याप्रमाणेच 'शिक्षण साक्षरता' हा शब्दही नीट समजून घ्यायला हवा.
शिक्षण साक्षरता म्हणजे शिक्षण कसे होते, शिकत असताना शिकणाऱ्याच्या मेंदूमध्ये नेमके काय घडत असते, शिक्षणाचा अर्थ काय, शिक्षणासाठी कोणी काय काय करायला हवे, कसे करायला हवे, मुले स्वतः शिकतात का त्यांना शिकवावे लागते, या आणि अशा सगळ्या गोष्टी नीट समजून घेणे होय.
लेखाच्या सुरुवातीला दिलेले चित्र नीट पहा. या चित्रामधील बालक खेळत आहे की शिकत आहे याचे नक्की उत्तर आपल्याला सांगता येईल का? यामधून हे बालक काय शिकत आहे याची नक्की माहिती आपल्याला आहे का ?
गंमत अशी की आपल्याला या गोष्टी पुरेशा माहीत नाहीत हे सत्य आपण मान्यही करत नाही.
खरे म्हणजे शिक्षणाबाबत ही माहिती प्रत्येक सामान्य नागरिकाला माहीत हवी, कारण प्रत्येकाला आपल्या मुला- मुलीचे शिक्षण चांगल्या प्रकारे व्हावे असे वाटत असते. पण त्याबाबत वर दिल्याप्रमाणे खरी खरी माहिती मात्र त्याला नसते.
म्हणून मी असे म्हणतो की आपण पुरेसे 'शिक्षण साक्षर' नाही.
आपण माझ्या मताशी सहमत आहात का ?

बाळकृष्ण बोकील.
------------



Tuesday, 19 June 2018

थोडे वेडे बनू या !




कधी कधी असं वाटतं की आपण फार कृत्रिमपणाने वागतो.
आपल्या भूमिका पार पाडताना आपल्यावर वेगवेगळी बंधने येतात.
पिता, पती, भाऊ,पत्नी, मुलगी,वृद्ध,युवक, शिक्षक, शिक्षित नागरिक,शेजारी,
अशा अनेक भूमिका करताना ही बंधने पाळावी लागतात.

लहानपणी एक गोष्ट बरी असते.
मुक्तपणा असतो. स्वच्छंदीपणाने वावरता येते.
वय वाढते तसा हा मुक्तपणा कमी कमी होत जातो.
मग आपण गंभीर बनतो. पोक्तपणाने वागतो, बोलतो.
हसणे विसरून जातो. खेळकरपणा नाहीसा होतो.

या मोठेपणाच्या ओझ्यातून बाहेर पडू या.
थोडे लहान मुलासारखे वागू या.
रंगीबेरंगी कपडे घालू या.
उड्या मारत चालू या.
मस्तपैकी खेळू या. अगदी काहीही. गोट्या, विटीदांडू, लगोरी असं सोपं सोपं.
जरा आरडाओरडा करू या.
भरपूर खिदळू या.
एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून चालू या.
फिरायला जाऊ. भेळ खाऊ. ओघळणारे आईस्क्रीम चाटून खाऊ.

कोण काय म्हणेल ते म्हणू देत.
यातली मजा त्यांना कशी कळणार ?
अलीकडचं शास्त्र असं सांगतं की यामुळे ताणतणाव कमी होतात.
खरंच आहे ते.
हे सगळं आपणच ओढवून घेतलं आहे, नाही का ?

जरा यातून मुक्त होऊ या.
थोडे वेडे बनू या !

Tuesday, 31 October 2017

सारासार विचार - एकआवश्यक जीवनकौशल्य

सारासार विचार  

माणसाला केवळ ज्ञान असून चालत नाही.ते ज्ञान कसे वापरायचे हे त्याला समजले पाहिजे.
मिळालेल्या माहितीचा, ज्ञानाचा किंवा कौशल्याचा वापर चांगल्या तसेच वाईट प्रकारे करता येतो. तो वापर चांगल्या कामासाठीच केला पाहिजे.
ज्ञान हे एक साधन आहे. ते एक प्रभावी आणि परिणामकारक साधन आहे. म्हणूनच ते अतिशय जबाबदारीने वापरायला हवे. 
ज्ञान आणि कौशल्य वापरताना केवळ बुद्धिवादी राहून चालत नाही. भावनेचाही विचार करावा लागतो. एकूण परिस्थितीचा अंदाज घ्यावा लागतो. परिणामाची जबाबदारी घ्यावी लागते. यालाच सारासार विचार करणे असे म्हणतात. 
सारासार विचार करणे हे एक वेगळेच महत्वाचे जीवनकौशल्य आहे.
त्याला साध्या भाषेत शहाणपणा असे म्हणतात. 
म्हणूनच सगळी हुशार माणसे नेहमीच शहाणपणाने वागतात असे दिसत नाही.
तर अगदी निरक्षर माणसेही शहाणपणाने निर्णय घेतात असे आपल्याला अनेक वेळा दिसून येते ते यामुळेच !

Friday, 29 April 2016

उद्योजकतेचे शिक्षण
                    सध्याची युवकांची स्थिती फार गंभीर आहे. कोट्यवधी युवक बेरोजगार आहेत . दहावी-बारावी  जेमतेम पास - नापास किंवा त्यापेक्षाही कमी शिक्षण, रोजगाराचे कोणतेही कौशल्य माहीत नाही . शेतीची कामेही येत नाहीत . शिक्षण चालू ठेवता येत नाही .  उद्योगाचे शिक्षण नाही . अशा विचित्र कात्रीत आज युवक सापडला आहे . याचे परिणाम फार गंभीर होत आहेत. केवळ आर्थिकच नव्हे तर सामाजिक दृष्टीनेही याकडे पाहिले पाहिजे. समाजातील युवक असे निराश, हतबल युवक असणे योग्य नाही. समाजातील जाणत्या लोकांनी एकत्र येऊन या बाबतीत विचार आणि कृती केली पाहिजे.

                 अशा युवकांसाठी उद्योजकतेचे शिक्षण व्यापक प्रमाणावर सुरु केले पाहिजे. हे शिक्षण सहजपणे उपलब्ध झाले पाहिजे. केवळ शहरी नव्हे तर ग्रामीण परिसराला पूरक अशा उद्योगांचे असे शास्त्रशुद्ध शिक्षण युवकांना जवळच्या परिसरात मिळेल अशी व्यवस्था करायला हवी.
                 यामध्ये युवतींचाही समावेश करायला हवा.