Sunday, 15 July 2012


अभ्यास-कौशल्ये (STUDY SKILLS)
      डॉ. बाळकृष्ण बोकील,  B.Sc., M.A., M.Ed., Ph.D. (Education)
 खाली काही मुद्दे दिले आहेत. त्यापैकी कोणते मुद्दे पालकांसाठी आहेत आणि कोणते मुद्दे पाल्यांसाठी आहेत ते शोधून काढा.

1.      अभ्यास – कौशल्यांचा आयुष्यभर उपयोग होतो. ती एक जीवनपद्धती व्हावी. त्यामुळे  वैज्ञानिक दृष्टी येते. चिकित्सक दृष्टीकोन प्राप्त होतो. अंधविश्वास नाहीसा होतो.
2.      विद्यार्थीदशेत अभ्यास-कौशल्यांचा आवाका मर्यादित असतो.
3.      अभ्यासक्रम समजून घ्या. त्यातून उद्दिष्टे लक्षात येतात. अभ्यासक्रम म्हणजे पाठ्यपुस्तके नव्हेत. पाठ्यपुस्तक हे केवळ एक साधन आहे.
4.      पाठ्यपुस्तकाशिवाय इतर साधने जमा करा. प्रत्येक साधनाचा उपयोग आणि मर्यादा समजून घ्या. साधन कसे वापरायचे ते समजून घ्या. पाटी, छोटा फळा, शैक्षणिक सीडी, परिसरातील वस्तू ही साधने मुलांना हाताळायला द्या.
5.      विविध प्रकारचे वाचन-साहित्य मिळवा. पुस्तकांच्या जोडीला छोट्या पुस्तिका, पत्रके, तक्ते, चित्रे, गोष्टी, गाणी, नाटुकली, कोडी, चुटके अशा गोष्टी मुलांना द्या.
6.      याशिवाय संदर्भ-पुस्तके, शब्दकोष, विविध विषयांचे कोष, मोबाईल फोन, इंटरनेट यांचा योग्य वापर करण्याचा आग्रह धरा.
7.      अभ्यासाचे नियोजन (Planning) करा. त्यामुळे अभ्यास वेळेवर पूर्ण होतो.
8.      ताजेतवाने असताना अभ्यास करा. प्रसन्न मनःस्थितीत अभ्यास लवकर पूर्ण होतो.
9.      एका वेळी जास्तीत जास्त ४० मिनिटे सलग अभ्यास करा. त्यानंतर ५-१० मिनिटे दुसरी कृती करा. त्यावेळी जागा किंवा बसण्याची स्थिती बदला. डोक्यात दुसरा कोणतातरी विचार येऊ द्या. मग पुन्हा पुढचा अभ्यास सुरु करा.  
10.  अभ्यासाचे टप्पे :
अ)   आज काय करायचे त्याचा अंदाज घ्या.
आ)  मुख्य मुद्द्यांवरून नजर फिरवा.
इ)     प्रत्येक मुद्यातील तपशील वाचून काढा. त्यावेळी अवघड मुद्द्याला जास्त वेळ द्या. माहितीचे वर्गीकरण करा. काय?,का?,कधी?,कसे?,कोठे?आणि कोण? (5WH) हे सहा  प्रश्न मनाला विचारून माहिती लक्षात ठेवा. फ्लो-चार्ट किंवा वर्गीकरणाचा तक्ता तयार करा. मुद्द्याच्या शीर्षकावरून त्यातील तपशील लक्षात ठेवण्याचा सराव करा.
ई)     सगळे मुद्दे वाचून झाल्यावर डोळे मिटून मुद्दे क्रमाने आठवा. काही विसरले तर पुन्हा चार्ट बघा. नंतर पाटीवर चार्ट लिहून काढा. दोन-तीन वेळा असा सराव केल्यावर मुद्दे पक्के लक्षात राहतील.
उ)     सगळ्या मुद्द्यांचा एकमेकांशी असलेला संबंध लक्षात घ्या. त्यामुळे पाठाचे संपूर्ण चित्र डोळ्यापुढे उभे राहील.
ऊ)    कोणत्याही मुद्द्याचा विस्तार करताना वर उल्लेख केलेल्या सहा प्रश्नांचा (5WH) वापर करा. आवश्यक तेथे खुलासा, स्पष्टीकरण, उदाहरणे द्या.
ऋ)   शेवटी आज केलेल्या अभ्यासाचा आढावा घ्या.
11.  भूमिती, गणित, विज्ञान, भूगोल अशा विषयांचा अभ्यास करताना तर्कशास्त्राचा जास्त वापर करावा लागतो. तेथे वरील सहा प्रश्न उपयोगी पडतात. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर शोधताना अनेक पर्याय पुढे येतील. त्यातील सर्वात योग्य आणि अचूक पर्याय निवडा. त्यासाठी मित्रांबरोबर चर्चा करण्याची सवय लावून घ्या. आपले उत्तर बरोबर कसे आहे ते पटवून द्या. त्यांचे म्हणणेही समजून घ्या. मुद्देसूद मांडणीची सवय हवी.
12.  आवश्यक तेथे सूत्रे पाठ करा, पण ती कशी तयार झाली आणि कशी वापरायची हे नीट समजून घ्या.
13.  आकृत्या पाटीवर पुनःपुन्हा काढून सराव करा. आकृत्या, चित्रे लक्षात ठेवणे सोपे असते.
14.  मजकूर स्वतःच्या भाषेत लिहायला शिका. मग उगीच पाठांतर करावे लागत नाही.
15.  भाषेच्या बाबतीत शब्दांचे आणि वाक्यांचे उच्चार लक्ष देऊन ऐका. त्यासाठी त्या भाषेतील संवाद, गाणी, गोष्टी ऐका. तसे बोलण्याचा प्रयत्न करा. मित्रांची, पालकांची मदत घ्या. टी.व्ही. तसेच रेडिओवरील बोलणे ऐका आणि तसे बोला. चुकांची काळजी न करता बोला.
16.  इंग्रजी शब्द बोलता येऊ लागल्यावर त्यांचे स्पेलिंग तयार करायला शिका. स्पेलिंग उच्चाराप्रमाणे तयार करता येते. ते कौशल्य शिकून घ्या. मग स्पेलिंग पाठ करत बसावे लागत नाही.
17.  ग्रंथालयाचा वापर करायला मुलांना शिकवावे लागते. पालकांनी मुलांबरोबर सुरवातीला ग्रंथालयात जावे. तेथे नावनोंदणी कशी करावी, पुस्तकांचे कॅटलॉग कसे पहावेत,  हवे ते पुस्तक कसे शोधावे, पुस्तक चाळून नोंदी कशा कराव्यात ते दाखवावे. संदर्भ-ग्रंथ, शब्दकोष, विविध विषयांचे कोष, संशोधनांचे अहवाल यांची ओळख करून द्यावी. नियतकालिके मुद्दाम दाखवावीत. त्यातील अगदी अलीकडचे संशोधनात्मक लेख दाखवावेत. विविध विषयांवर काम करणाऱ्या संस्थांची ही ग्रंथालये म्हणजे माहितीचे खजिने आहेत.
18.  वाचन-लेखनाशिवाय इतर अनेक पद्धतींनी अभ्यास करता येतो. निरीक्षण, कृती, प्रयोग, चर्चा, गटकार्य, प्रकल्प, अभ्यास-भेटी, उमेदवारी, रेडिओ ऐकणे, टी.व्ही. पाहणे, शैक्षणिक सीडी/डीव्हीडी पाहणे, इंटरनेट वापरणे अशा अनेक मनोरंजक आणि आकर्षक पद्धतींनी अभ्यास अधिक चांगला होतो. एका जागी बसून एकट्याने अभ्यास करण्यापेक्षा ह्या सहभागी पद्धती जास्त परिणामकारक असतात.
19.  मुले सतत शिकतच असतात. शिकायला उपयोगी पडतील अशा विविध उपक्रमांची मांडणी  त्यांच्याभोवती करणे ही पालकांची जबाबदारी आहे. शाळेच्या आणि शिक्षकांच्या मर्यादा लक्षात घेऊन पालकांनी याबाबत पुढाकार घ्यायला हवा.
20.  छोटया गटामध्ये काम जास्त प्रभावीपणे होते. तीन-चार मुलांच्या पालकांनी एकत्र येऊन जबाबदारी वाटून घेतल्यास हे काम यशस्वी होईल. एकदा मुलांना स्वयं-अध्ययनासाठी प्रेरणा दिली आणि हे उपक्रम योजले की मुलांची कशी घोडदौड सुरु होते ती पहाच !

शासनमान्य आधुनिक संकल्पना समजून घ्या ! इतरांनाही सांगा !!
शाळेविना शिक्षण * पाठ्यपुस्तकाविना शिक्षण * शालेय शिक्षकांविना शिक्षण
मुक्त शिक्षण * काम करून शिक्षण * कमी खर्चात शिक्षण * दर्जेदार शिक्षण
होय , हे शक्य आहे !
संपर्क: मेरिट सेंटर, `श्रद्धा`, ४४/९२, नवसह्याद्री सोसायटी, कर्वेनगर, पुणे-४११०५२
फोन:020-69000002, (Mob):09823918223,E-mail:bgbokil@yahoo.com
                                                                  -------------------

स्त्रीभ्रूणहत्या आणि आपण


स्त्रीभ्रूणहत्या आणि आपण
                           डॉ. बाळकृष्ण बोकील.
सध्या स्त्रीभ्रूणहत्या हा विषय खूप चर्चेत आहे. हा विषय महत्वाचा आहे आणि त्यावर चर्चा होणे गरजेचेही आहे. चर्चा झाल्यामुळे एखाद्या प्रश्नाच्या विविध बाजू समोर येतात. त्यामुळे एक प्रकारे समाजप्रबोधन घडून येते. त्यातून समाजाची मानसिकता तयार होण्यास मदत होते. सामाजिक विकासासाठी या सगळ्या गोष्टींचा निश्चितपणे उपयोग होतो.
स्त्रीभ्रूणहत्या या विषयावरील चर्चेकडे मी जेव्हा या दृष्टीने पाहतो तेव्हा मला त्यामध्ये अनेक धक्कादायक घटक दिसतात. त्यातील पहिला आणि सर्वात महत्वाचा मुद्दा असा की स्त्रीभ्रूणहत्येशी आपला काहीही संबंध नाही असा प्रत्येकाचा असलेला समज. या बाबतीत आपण जरा सखोल विचार करायला हवा असे मला वाटते. त्या दुर्दैवी बाळाची आई किंवा कुटुंबीय हत्येच्या या क्रूर आणि कठोर निर्णयापर्यंत का येतात हे समजून घेणे आवश्यक आहे. याचे कारण उघड आहे. `मुलगी नको` या मानसिकतेतून लोक या थराला जातात ही गोष्ट आता सगळ्यांना माहीत झालेली आहे. पण `मुलगी नको` असा विचार एखाद्याच्या मनात का येतो?
आपली पुरूषप्रधान विचारसरणी याला कारणीभूत आहे. आपण स्त्रीला नेहमीच पुरुषापेक्षा कमी लेखत आलो आहोत. स्त्रीचे स्थान दुय्यम आहे असे आपण कायम गृहीत धरत आलो आहोत. तात्विक चर्चेमध्ये काहीजण स्त्रीला देवता वगैरे म्हणतात पण व्यवहारात मात्र त्यांचे वागणे स्त्रियांना कमी लेखणारे असते. लहानपणापासून वृद्धावस्थेपर्यंत सर्व अवस्थांमध्ये हेच चित्र दिसते. लहानपणी वडील, तरुणपणी नवरा आणि म्हातारपणी मुलगा यांच्यावर ( या पुरुषांवर ) स्त्रीने अवलंबून राहावे अशीच आपली पक्की समजूत असते. प्रत्येक गोष्टीसाठी कुणावर तरी अवलंबून राहणे हे त्रासदायक असते. आपले वागणे- बोलणे, आपली मते, आपले विचार, आपले निर्णय, आपल्या आवडी-निवडी या सगळ्या बाबतीत मग बंधने येतात. आर्थिक बाबतीतील अशी बंधने जीवनाच्या सर्व बाजूंना स्पर्श करतात. स्त्री आणि पुरुष दोघांच्याही बाबतीत हे सत्य आहे, पण स्त्रियांच्या बाबतीत याची भीषणता अधिक आहे. समाजाकडे न्याय मागावा तर समाजावर परंपरा आणि चालीरीती यांचा इतका जबरदस्त पगडा आहे की न्यायाच्या ऐवजी अन्यायच पदरी पडतो. एक प्रसिद्ध नाट्यगीत असे आहे,
परवशता पाश दैवे ज्याच्या गळा लागला,
सजीवपणी घडती सारे मरणभोग त्याला
सौख्यभोग इतरां सारे, कष्ट मात्र याला.
हे या ठिकाणी अक्षरशः खरे ठरते. शिक्षण, आरोग्य, रोजगार, कुटुंब, समाजकारण, अर्थकारण, राजकारण या सर्व बाबतीत दुय्यम स्थान असलेल्या स्त्रीला आयुष्यभर  फक्त कष्ट करावे लागतात. त्यागाच्या गोंडस बुरख्याखाली या यमयातना तिला आयुष्यभर सोसाव्या लागतात. तिची प्रचंड मानसिक घुसमट होते.
हे सगळ्यांनाच माहीत असते. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर हे चुकणार नसते. मग असा हा स्त्रीजन्मच नको ही भावना वाढायला लागते. याशिवाय अनेक जुनाट कल्पना मनात पक्क्या रुजलेल्या असतात. `मुलगा हा वंशाचा दिवा`, `म्हातारपणी मुलगाच आधार देणार`, अशा खुळचट समजुती मुलाची भलावण करीत मुलीला नाकारत असतात. या सगळ्याचा परिणाम एकच. `मुलगी नको` या विचारावर सगळ्यांचे एकमत. समाजाचा नाकर्तेपणा येथे स्पष्टपणे दिसतो. जन्मानंतर स्त्रीला भोगायला लागणारा हा त्रास नाहीसा करण्याऐवजी समाज स्त्रीजन्मच नाहीसा करू बघतो. स्त्री-पुरुष, तरुण-वृद्ध, नेते-कार्यकर्ते, सगळ्यांचे विचार एकाच प्रकारचे. मग  त्या बाळाच्या आईलाही तसेच वाटायला लागते. एखादी आई याला विरोध करतेही, पण तिचा क्षीण आवाज कुटुंबियांकडून कसा दाबला जातो हे कोणाला कळतही नाही. स्त्रीभ्रूणहत्येच्या सर्व घटनांशी संपूर्ण समाजाचा असा जवळचा संबंध आहे. मुलगी जन्माला येणे नकोसे वाटावे इतकी स्त्रियांची वाईट अवस्था आपण कळत-नकळत करून टाकली आहे.
मला जाणवलेला दुसरा मुद्दा आहे तंत्रज्ञानाचा गैरवापर. गर्भलिंगनिदान आणि गर्भपात यांचे तंत्रज्ञान निर्माण झाले ते समाजाच्या हितासाठी, पण समाजातील वाईट प्रवृत्तीचे लोक या तंत्रज्ञानाचा गैरवापर सर्रासपणे स्वार्थासाठी करीत आहेत. समाजातील सुशिक्षित आणि जाणत्या लोकांनी या प्रवृत्तीच्या लोकांकडे काणाडोळा करून एक प्रकारे त्यांना अभय दिलेले आहे. आता ही प्रवृत्ती नियंत्रणाबाहेर गेली आहे आणि त्याचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत. कोणतेही तंत्रज्ञान वापरताना  काही गोष्टींची काळजी घ्यायची असते. त्या तंत्रज्ञानाचा गैरवापर होऊ नये म्हणून नियम, कायदे करून त्यांची कठोरपणे अंमलबजावणी करायची असते हे आपण विसरून गेलो आहोत. त्यामुळे तंत्रज्ञानाचा गैरवापर करणाऱ्यांना अवाजवी स्वातंत्र्य मिळाले आहे. त्याचा गैरफायदा हे घेऊन लोक स्वार्थ साधीत आहेत. शासन, लोकप्रतिनिधी आणि सामान्य जनता यांनी अशा स्वार्थी आणि संधीसाधू लोकांवर वचक ठेवून त्यांना अशा गैरकृत्यांपासून रोखायला हवे. विशेषतः विरोधी पक्षनेत्यांनी अशा प्रवृत्तींवर करडी नजर ठेवून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी शासनावर दबाव आणायला हवा. पण सर्व पक्षांनी याकडे सोयिस्करपणे दुर्लक्ष केलेले आहे. सर्वसामान्य जनतेनेही पक्षनेत्यांकडे यासाठी आग्रह धरलेला नाही. म्हणजेच या बाबतीत शासन, लोकप्रतिनिधी आणि तुमच्यामाझ्यासारखे सामान्य लोक जबाबदारीने वागलेले नाहीत असे दिसते. या प्रवृत्तींविरुद्ध आवाज उठविणाऱ्या संस्था आणि कार्यकर्त्यांच्या मागे आपण ठामपणे उभे राहायला हवे. शासनावर दबाव आणायला हवा.
सद्यपरिस्थितीत वरील दोन मुद्द्यांबाबत आपण सर्वसामान्य माणसांनी पुढील गोष्टी करायला हव्यात, असे मला वाटते.
(अ)  स्त्री-पुरुष समानता निर्माण व्हावी म्हणून:
१.     स्वतःपासून सुरवात करू या. स्त्रियांना कमी लेखणे थांबवू या.
२.     कुटुंबातील सर्व स्त्रियांना (लहान मुलींसह) सन्मानाने वागवू या.
३.     कुटुंबातील सर्व स्त्रियांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देऊ या. स्त्रियांना शिकायला वेळ मिळावा म्हणून त्यांना कामात मदत करू या. ह्यासाठी कुटुंबातील इतरांना तयार करू या. त्यासाठी आग्रह धरू या.
४.     कोणताही लहानमोठा निर्णय घेताना स्त्रियांचे मत विचारात घेऊ या.
५.     कुटुंबातील मुली आणि स्त्रिया स्वावलंबी होतील असे प्रयत्न करू या.
६.     स्त्रियांवर कळत-नकळत होणारे अत्याचार आणि अन्याय रोखू या.
७.     स्त्रियांसंबंधीचे कायदे समजून घेऊन त्याप्रमाणे वागू या.
८.     सार्वजनिक जीवनात स्त्रियांना सन्मानाने वागवू या.
९.     वृद्धापकाळाची व्यवस्था करून ठेवू या, तसेच त्यासाठी सार्वजनिक व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करू या. त्यासाठी तरुणपणी कर भरू या. पेन्शन, विमा अशा गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष देऊ या. म्हातारपणी मुलगी तसेच जावयाची मदत आनंदाने स्वीकारू या.
    १०. स्त्री-बालकाचे स्वागत करू या, त्याचा आनंद जाहीरपणे व्यक्त करू या.
  (ब) तंत्रज्ञानाचा गैरवापर रोखण्यासाठी:
१.     आपण गर्भलिंगतपासणी करणार नाही असे जाहीर करू या आणि तसे           ठामपणे वागू या.
२.     गर्भलिंगतपासणी करणाऱ्यांना सर्व मार्गांनी समजावून सांगून त्यापासून रोखू या. ऐकले नाही तर कायद्याची जाणीव करून देऊन त्यापासून रोखू या. विरोधाला खंबीरपणे तोंड देऊ या.
३.     भ्रूणहत्या करणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात जाहीर भूमिका घेऊ या. भ्रूणहत्या होऊ नये म्हणून काम करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींना पाठिंबा देऊ या.
४.     भ्रूणहत्या करणाऱ्या डॉक्टरांविरुद्ध कायदेशीर कारवाई करू या.

आपण बरेच काही करू शकतो. आपण एकत्र येऊन भ्रूणहत्येचा प्रकार थांबविण्यासाठी त्वरित कृती करायला हवी.

------------------------------------------------------------------------------------